जगन्नाथ पुरीतील रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत ६०० भाविक जखमी

गर्दी वाढल्याने प्रशासनाचे नियोजन कोलमडले, अनेकांची प्रकृती गंभीर, हत्ती बिथरल्यानेही भाविकांची धावाधाव

पुरी – ओडिशामधील पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ यात्रेत मोठी गर्दी झाली असून यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे. या चेंगराचेंगरीत ६०० जण जखमी झाले असून ८ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि बंधू बलभद्र यांच्या रथांना श्री गुंडिचा मंदिराकडे ओढत असताना गजपति राजाच्या महालाजवळ ही चेंगराचेंगरी झाली. सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी रथ यात्रेला सुरुवात झाल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि भाविकांनी एकमेकांना ढकलत धावाधाव सुरू केली. या गोंधळात अनेक जण बेशुद्ध पडले. गर्दी एवढी वाढली होती की, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला ती नियंत्रित करण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी भाविकांना त्वरीत पुरी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सर्वांचं उपचार सुरू आहेत. ओदिशाचे आरोग्य मंत्री मुकेश महालिंग यांनी सांगितले की, उष्णता आणि दमट हवामानामुळे काही भाविक बेशुद्ध झाले. बचाव पथकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचवले. मंदिर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहेत आणि ग्लूकोज व पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे. जगन्नाथ रथ यात्रा ही ओडिशातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक या यात्रेत सहभागी होत असतात. दरम्यान अहमदाबादमध्येही हत्ती बिथरल्याने काही भाविक जखमी झाले आहेत.

 

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये देखील रथ यात्रेदरम्यान अशीच चेंगराचेंगरी झाली होती. त्या वेळी अतिप्रचंड गर्दीत दम गुदरमल्यामुळे एका भाविकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदा प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तरीही, पुन्हा एकदा मोठा अपघात टळला असला तरी भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.