कल्याण – कल्याणमध्ये एका अमराठी व्यक्तीने मराठी कुटुंबाला शिवीगाळ करत जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अखिलेश शुक्ला नावाच्या एका सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख या मराठी माणसाला मारहाण केली आहे. कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीत ही घटना घडली आहे.
कल्याण पश्चिमेत आजमेरा हाईट्स/१, योगीधाम ही बिल्डिंग आहे. बुधवारी रात्री पावणे आठ वाजता लता बाळकृष्ण कळवीकट्टे यांचे अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नी गीता शुक्ला यांच्याशी धुप अगरबत्ती लावल्याने आणि धुर झाल्याचे कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होता. त्यावेळेस अखिलेश शुक्ला हा लता कळवीकट्टे यांना अपमानीत करत होता, “तुम मराठी गंदे लोग तुम मच्छी मटण खाते हो. झोपडपट्टी में रहो. तुम मराठी निच हो, तुम्हारी औकात नहीं है बिल्डींग में रहने की,” असे शब्द शुक्लाने वापरले. धीरज देशमुख मधे पडले आणि धीरज यांनी अखिलेश शुक्ला यांना म्हटलं की, तुमचे आणि काकुंचे भांडण आहे ते तुम्ही आपसात मिटवुन घ्या. पण सर्व मराठी लोकांना का अपमानीत करताय. यावेळी अखिलेश शुक्ला म्हणला की “मी मंत्रालयात कामाला आहे, तु मला मराठीचे सांगू नकोस तुझ्या सारखे ५६ मराठी लोक माझे समोर झाडू मारतात. एक मिनिट मै चिफ मिनिस्टर के ऑफिस से फोन करूंगा तो तुम्हारा पुरा मराठीपण निकल जायेगा. आधा घंटा रूक तेरा मर्डर कर देता हु” अशी धमकी दिली. त्यानंतर पुन्हा एकदा तुमको मालुम नही. मै कौन हुं, सारी पोलीस मुझसे डरती है. अभी तुम्हारा मराठीपण निकालता हू. मुझे सिर्फ अधा घंटा दो, अशी धमकी देत बाहेरच्या लोकांकरवी देशमुख कुटुंबाला मारहाण केली आहे. तसेच यावेळी देशमुख कुटुंबातील महिलांबद्दल देखील अपशब्द वापरण्यात आले आहेत. यासर्व प्रकरणात अभिजित देशमुख जबर जखमी झाले आहेत, तर धीरज देशमुखही जखमी आहेत.
देशमुख यांची तक्रार होती त्याप्रमाणे एफआयआर दाखल केली आहे. तसंच शुक्ला यांच्या तक्रारीवरुनही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपींना अटक केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि आंदोलन करणार असा इशारा मनसेने दिला आहे.