
नोंदणी केल्यावर आठ दिवसात मिळणार नंबर प्लेट, एवढा येईल खर्च, ‘ही’ आहे शेवटची तारीख

पुणे – सरकारकडून २०१९ च्या आधीच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी ३० एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आता ग्राहकांची संख्या जास्त असल्याने पुण्यात या नंबर प्लेट्स बसवण्याची सुविधा अधिक केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० एप्रिल २०२५ ही शेवटची तारीख आहे. यासाठी केवळ काही दिवसांचा कालावधीच शिल्लक आहे आणि नोंदणीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे वेटिंग पिरियड हा ३० दिवसांवर पोहोचला आहे. हाच कालावधी ८ ते १० दिवसांवर आणण्याच्या दृष्टीने पुणे आरटीओकडून नव्याने ५५ केंद्रांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना नोंदणी केल्यानंतर ८ दिवसांत एचएसआरपी नंबर प्लेट लावून मिळणार आहे. एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट्स अशा पद्धतीने बनवलेल्या असतात ज्यामध्ये कोणाला बदल करता येत नाही. बनावट पाटी बनवणे कठीण आहे. त्यामुळे वाहन चोरीपासून प्रतिबंध होतो. ही नंबर प्लेट तुम्हाला घरी बसवता येत नाही, कारण याला नट बोल्टच्या फिटिंगला परवानगी नाही. एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट्सची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदणी होते आणि तुमच्या वाहनाशी जोडल्या जातात. त्यामुळे वाहन कोणाच्या मालकीचे आहे हे लगेच शोधता येते. दरम्यान पुण्यात ७ मार्चपर्यंत १,१२,५४८ वाहनधारकांनी अर्ज केले असून, त्यातील २५,०४३ वाहनांवर HSRP बसवण्यात आली आहे. अनेकजण वेटिंगवर असल्याने ही संख्या वाढवण्यात आली आहे.
खर्च किती येतो?
दुचाकींसाठी
-नंबर प्लेटची मूळ किंमत ४०५ रुपये
-फिटमेंट चार्जेस- ४५ रुपये
-होम डिलिव्हरी- १२५ रुपये
-एकूण किंमत ५७५ रुपये
-१८ टक्के जीएसटी- १०३.५० रुपये
-अंतिम किंमत- ६७८.५० रुपये
तीन चाकींसाठी
-नंबर प्लेटची मूळ किंमत ४५५ रुपये
-फिटमेंट चार्जेस – ४५ रुपये
-होम डिलिव्हरी – १२५ रुपये
-एकूण किंमत – ६२५ रुपये
-१८ टक्के जीएसटी – ११२.५० रुपये
-अंतिम किंमत – ७३७.५० रुपये
चार चाकी व जड वाहनांसाठी
-नंबर प्लेटची मूळ किंमत ७०० रुपये
-फिटमेंट चार्जेस – ४५ रुपये
-होम डिलिव्हरी – १२५ रुपये
-एकूण किंमत – ८७० रुपये
-१८ टक्के जीएसटी – १५६.६० रुपये
-अंतिम किंमत – १०२६.६० रुपये









