एसटीतील महिलांची ५० टक्के सूट बंद होणार?

लाडक्या बहीणींमुळे लालपरी तोट्यात, दिवसाला इतक्या कोटींचा तोटा, आता सवलत मिळणार नाही?

मुंबई – राज्य सरकारने निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या योजना आणि सवलंतीचे गंभीर परिणाम समोर येत आहेत. लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला लाखो महिलांना वगळण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता एसटीची देखील सवलत बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महिलांना लालपरी म्हणजेच एसटी प्रवासात ५० टक्के सूट अर्थात अर्ध तिकीट दिले होते, यामुळे एसटी महामंडळाला दिवसाला ३ कोटीचा तोटा झाला, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. लाडक्या बहिणींना ५० टक्के सवलत, ७५ टक्क्यांवरील ज्येष्ठांना सवलत दिली आहे. त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे की, महामंडळ दर दिवसाला ३ कोटी तोट्यात आले आहे, त्यामुळे आता कोणालाही सवलत देता येणार नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. महत्वाचे म्हणजे एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी नुकतीच देवास करण्यात आली आहे, तरीही एसटी तोट्यातच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे एसटी कर्मचारी देखील हालाखीत आहेत कारण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू केल्यापासून ऑक्टोंबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे फंडावारील उचल प्रकरण प्रलंबित आहेत. दरम्यान राज्य सरकार पीपीपी तत्वावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३,३६० एकर जमिनीवर खासगी बिल्डर्सच्या माध्यमातून विकास करण्यासाठी आमंत्रित करणार आहे. यासाठी राज्य सरकार लवकरच १५० निविदा काढणार आहे, असे सरनाईक म्हणाले आहेत. एकंदरीत एसटीच्या फायद्यासाठी मोक्याच्या जागा खाजगी बिल्डरला दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लालपरी ही सर्वसान्यांचे हक्काचे वाहन आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटीची सेवा उपलब्ध आहे. यामुळे ग्रामीण भागातील ८० ते ९० टक्के प्रवासी एसटीबसने प्रवास करतात. पण आता हीच लालपरी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचे लाड बंद होण्याची शक्यता वाढली आहे.