महिलांची एसटीतील ५० टक्के सवलत बंद होणार?

तिकिट दरवाढीनंतर चर्चेला उधान, परिवहन मंत्री म्हणाले, आर्थिक तोटा होतोय त्यामुळे…

मुंबई – इंधनाची झालेली दरवाढ, टायर आणि इतर वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे एस.टी.च्या तिजोरीवर पडलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने एस.टी. महामंडळाला शनिवार, आज म्हणजे २५जानेवारीपासून १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे.

नव्या तिकीट दरवाढीनुसार साधी बस, जलद सेवा, रात्र सेवा, निमआराम, विनावातानुकूलित शयन आसनी, विनावातानुकूलित शयनयान, शिवशाही (वातानुकूलित), जनशिवनेरी (वातानुकूलित) या बसेसच्या पहिल्या टप्प्यापासून तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. सध्या एस.टी.ला दिवसाला २८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. भाडेवाढीनंतर त्यात ४ कोटी रुपयांची वाढ होईल, असा अंदाज आहे. म्हणजेच दिवसाला ३२ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा होतील. पण या भाडेवाढीनंतर महिलांची ५० टक्के सवलत बंद होणार अशी चर्चा सुरु झाली होती. याविषयी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एस.टी. महामंडळाला दररोज तीन कोटी, तर महिन्याला ९० कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत या भाडेवाढीला सरनाईक यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच आमच्या सरकारने ज्या जुन्या सवलती आणि योजना सुरु केल्या आहेत, त्यामध्ये कुठेही कपात होणार नाही. सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींना देण्यात आलेली ५० टक्के सूट कायम राहिल. या सवलतीमुळेच एसटीचं उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेत कटोती होणार नाही”, असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. यासोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ ३ रुपयांनी करण्यात आली आहे. नवे दर १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.

एसटीची दिवाळीतील हंगामी भाडेवाढ राज्य सरकारने रद्द केली होती; परंतु वाढता तोटा पाहता महामंडळाने राज्य सरकारला १५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. याआधी २०२१ मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती, तर गेल्या दोन वर्षांत चार वेळेस भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. याआधी २०२१ मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती, तर गेल्या दोन वर्षात चार वेळेस भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.