
जुन्या भांडणातून पाच जणांनी सोसायटीमध्ये शिरुन पार्किंगमधील वाहनांवर पेट्रोल टाकून त्यांना आग लावून देण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एक कार व २ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

निखिल चव्हाण (वय २५), महेंद्र आहुजी (वय २२) आणि आदित्य साखरे (वय २१) अशी अटक केलेल्यांची नावे असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याबाबत विरेंद्र चंद्रकांत अमराळे (वय ३८) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गगनविहार सोसायटीत रविवारी पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांनी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरुन पाच जणांनी पहाटे सोसायटीत प्रवेश केला. त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटलीत पेट्रोल घेऊन आले होते. गगनविहार सोसायटीचे मुख्य गेटमधून सिक्युरिटी गार्ड समोरुन आत आल्यावर ई विंगच्या प्रवेशद्वाराजवळील कार पार्किगमध्ये उभ्या असलेल्या २ दुचाकी व एक कारवर पेट्रोल टाकून आग लावली. त्यात ही तीनही वाहने जळून गेली. आग लावून ५ लाख १० हजार रुपयांचे नुकसान करुन सोसायटीतील लोकांची सुरक्षितता धोक्यात आणली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मोरे तपास करीत आहेत.









