‘या’ महिन्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार २१०० रुपये

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. या योजनेमुळेच लोकसभेला अवघ्या १७ जागा जिंकणाऱ्या महायुतीने विधानसभेत तब्बल २३२ जागा जिंकत महाविकास आघाडीचा सुफडा साफ केला. आता महायुती सरकार लाडक्या बहिणींना दिलेले आणखी एक आश्वासन पूर्ण करणार आहे.

लाडकी बहिण योजनेची घोषणा महायुती सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. त्यानंतर जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली, जुलैपासून ते डिसेंबर अशा सहा महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिला लाभार्थ्यांच्या खात्यावर १५०० रुपये जमा केले जातात. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता २ कोटी ३४ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना लाडकी बहीण योजनेंतर्गत २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे लाभार्थी महिला २१०० रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. तर महिलांना २१०० रु. हे जानेवारीपासून मिळणार असल्याची चर्चा समाजमाध्यमावर रंगली होती. पण महिलांना मार्चपर्यंत १५०० रुपयेच भेटणार आहेत. तर आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी वाढीव निधीची तरतूद केल्यानंतर महिलांना एप्रिल किंवा मे पासून २१०० रु मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेचा कुणालाही फटका बसू नये, यासाठी फडणवीस स्वत: पुढे येऊन आर्थिक नियोजन करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इतर विभागांच्या बजेटमध्ये कपात केली जाऊ शकते किंवा लाडकी बहीण योजनेकडे वळवली जाऊ शकते.

राज्यातील योजनांच्या पूर्तेतेसाठी अधिवेशनात ३५ हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली, ज्यामध्ये १४ हजार कोटींच्या अतिरिक्त निधीची तरतूद ही एकट्या लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे, तर या योजेनेवरील  जाहिरातींच्या खर्चासाठी १०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.