पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी 2 पोलिस अधिकारी सेवेतून बडतर्फ, नेमकं काय घडलं, कुठे केली चूक?

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. एका अल्पवयीन तरूणाने १९ मे २०२४ रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात एका भरधाव पोर्शे कारने २ जणांचा जीव घेतला होता. अपघात प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलिस ठाण्याचे २ अधिकारी शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहेत.

पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना पाच वर्ष पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्यक्षदर्शी म्हणून घटनास्थळी पोहचलेल्या दोन पोलिसांनी ही माहिती कंट्रोल रुमला न कळवल्याने अपघाताची माहिती रात्री ऑन ड्युटी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहचली नव्हती, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. 19 मे 2024 च्या रात्री पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका हाय-स्पीड पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांना धडक दिली होती. दोन्ही अभियंते (अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया) यांचा या अपघातात जागीच मृत्यृ झाला होता. अपघाताच्या वेळी गाडी चालवणारा तरूण हा 17 वर्षे आणि 8 महिन्यांचा होता आणि तो दारू पिलेला होता. पुणे पोलिसांनी त्याला प्रौढ म्हणून वागवण्याची मागणी केली होती, कारण तो 18 वर्षांपेक्षा फक्त 4 महिने कमी वयाचा होता.