नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 16 वर्षीय मुलाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. तेजस विठ्ठल आहेर असं मृत तरुणाचं नाव आहे. शाळकरी मुलाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या लहवित गावात ही घटना घडल्यानंतर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सायंकाळी ही घटना घडली असून पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उन्हाळा सुरू झाला, की साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्याचा काळ म्हणजे उष्माघाताची शक्यता वर्तवली जाते. उष्माघात म्हणजे केवळ उष्णतेचा त्रास किंवा उन्हाचा त्रास नसून, यामुळे इतरही काही आजार संभवतात; पण उष्माघातामुळे हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो, हे फार कमी लोकांना माहिती आहे. बाहेरचं तापमान प्रचंड वाढत असतं आणि तुलनेत शरीराच्या आत पाण्याचं प्रमाण वेगानं कमी होत असतं. यामुळं शरीरातल्या काही क्रियांवर परिणाम होतो. यातच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो, असं तज्ज्ञ सांगतात.
पुढचे दोन दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर कामाशिवाय पडणं टाळा. शिवाय आरोग्याची काळजी घ्या. तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका गेल्या काही महिन्यांपासून वाढत आहे. तणाव, हवामानातील बदल, खाण्या-पिण्याच्या पद्धती बदलती जीवनशैली यामुळे हा धोका वाढत असल्याचा अंदाज आहे.