विहिरीत पडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू ; इंदापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेल्या पंधरा वर्षांच्या मुलीचा पाय घसरल्याने ती विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना सोमवारी दि.२४ रोजी राजवडी पाटी येथे घडली आहे. सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

सारिका पिराजी शिंदे वय १५ असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. सारिका ही आपल्या आई-वडिलांबरोबर मजुरीच्या कामासाठी राजवडी येथे आलेली होती. सोमवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास सारिका पाणी भरण्यासाठी शेजारच्या विहिरीवर आली. त्यानंतर बराच वेळ झाला तरी परत आली नाही. त्यामुळे परिसरात तिच्या कुटुंबाने शोध घेतला. विहिरीजवळ आल्यानंतर तिने आपल्यासोबत नेलेल्या काही वस्तू विहिरीच्या कडेला आढळून आल्या. पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील पाण्याचा साठा कमी करीत सारिकाला शोण्याचे कार्य सुरु झाले. साडेसहा तासानंतर दोघा तरुणांच्या हाती तिचा मृतदेह लागला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यापासून तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, इंदापूरचे सहायक पोलीस निरीक्षक एस.ई. राऊत व त्यांचे सहकारी घटनास्थळी थांबून शोधकार्य राबवीत होते.

बिजवडी ग्रामपंचायतीने चार दिवसांपूर्वी विहिरीची मालकी असणाऱ्या कर्मयोगी सहकारी साखर कारखाना प्रशासनाला विहिरीवर उंच रिंग उभारावी किंवा ती बुजवून टाकावी, असे पत्र दिले होते. त्यातच ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.