मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर देशातील पहिल्या स्मार्ट व इंटेलिजंट सातनवरी गावाचा शुभारंभ
नागपूर – आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून शेती, आरोग्य, शिक्षण आदी महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचे रोल मॉडेल उभे राहिले असून लवकरच राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील १० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास ३ हजार ५०० गावे स्मार्ट व इंटेलिजंट करणार असल्याचे प्रतिपादन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हाईस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायजेसने (व्हाईस) देशांतर्गत २४ कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत राज्य शासन व नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सातनवरी गावात आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा उपलब्ध करून देत या गावाला देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव बनविले आहे. प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेल्या या स्मार्ट व इंटेलिजंट गावाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून गावात सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सातनवरी गावात सुरू झालेला देशातील स्मार्ट व इंटेलिजंट गावाचा शुभारंभ हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. गावांना सक्षम करण्याच्या दिशेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून देशातील गावागावांमध्ये भारतनेट प्रकल्प राबविला गेला. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची यशस्वी अंमलबजावणी राज्यात झाली व दुसऱ्या टप्प्याची सुरूवातही झाली. याच धर्तीवर महाराष्ट्रात महानेट हा प्रकल्प राबविण्यात आला. आता याच प्रवासात भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत गावांमध्ये आरोग्य, शिक्षणासोबतच स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे किटकनाशके व खत फवारणी, बँक ऑन व्हिल, स्मार्ट टेहळणी अशा एकूण 18 सेवा कमी वेळात उपलब्ध करून देत सातनवरी हे देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव ठरले आहे.
सातनवरी गावाने अल्पावधीतच स्मार्ट व इंटेलिजंट गाव बनण्याचा बहूमान मिळवला असून लवकरच राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात 10 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील जवळपास 3 हजार 500 गावे स्मार्ट व इंटेलिजंट करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.