शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी दरम्यान सामंजस्य करार

‘केंब्रिज’सोबतचा सामंजस्य करार जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा टप्पा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडियाकडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडीया दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर केंब्रिजच्या वतीने आंतरराष्ट्रीय शिक्षण गटाचे व्यवस्थापकीय संचालक रॉड स्मिथ आणि राज्याच्या वतीने शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी स्वाक्षरी केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळविण्याच्या दिलेल्या संधीच्या दिशेने महाराष्ट्राने प्रवास सुरू केला आहे. या करारामुळे केंब्रिजचे कौशल्य आणि राज्यातील शिक्षण क्षेत्र एकत्र आल्याने विद्यार्थ्यांना असे शिक्षण मिळवून देता येईल. या करारामुळे तो प्रवास अधिक फलदायी ठरेल. केंब्रिज हे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे नाव असल्याचे नमूद करताना त्यांनी, केंब्रिजने शिक्षण क्षेत्रात विकसित केलेल्या चांगल्या पद्धतींमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. आज आपण सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, तथापि हे पहिले पाऊल असून अजून मोठा प्रवास बाकी आहे. या प्रवासात आपण केंब्रिजसोबत भागीदार राहणार आहोत. मी स्वतः या कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. महाराष्ट्र राज्य प्रशासन, पायाभूत सुविधा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांत सातत्याने नवे आदर्श निर्माण करत आहे. आज केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे शालेय शिक्षणात जागतिक दर्जाकडे एक पाऊल पुढे टाकले गेले आहे, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी सांगितले. हा करार विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा आणि नव्या पिढीतील नाविन्यपूर्ण व नेतृत्वक्षम तरुणांना दिशा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

केंब्रिजकडे जागतिक दर्जाचे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, पाठ्यपुस्तके, डिजिटल सामग्री व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती उपलब्ध आहेत. या सामंजस्य कराराअंतर्गत केंब्रिज शिक्षकांसाठी विषयानुरूप प्रशिक्षण कार्यक्रम, राष्ट्रीय शिक्षण धोरणास अनुरूप आणि सीबीएसई-सुसंगत शैक्षणिक साधनसामग्री, आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘क्लायमेट क्वेस्ट’ सारखा हवामान शिक्षण कार्यक्रम व पूर्व-प्राथमिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे.